रक्ताची गरज पडते तेंव्हा
आपल्या एखाद्या नातेवाईकाच्या अपघातानंतर आपल्याला रक्तपेढीत जाऊन रक्त मिळवावे लागले आहे काय? आपल्या कुटुंबियांपैकी कोणाच्या हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी दहा पंधरा रक्तदात्यांना शोधावे लागले आहे काय? अचानक सिझेरियन प्रसूती करायची गरज पडल्यास पाहिजे त्या रक्त गटाची एक बाटली मिळवण्यासाठी आम्हाला जिवाचा केव्हडा आटापिटा करायला लागतो ते एक हॉस्पिटल संचालक म्हणून छोट्या हॉस्पिटलमधे काम करणार्‍या माझ्यासारख्या वैद्यकीय व्यावसायिकाला वारंवार अनुभवावे लागते. हव्या त्या रक्तगटाचे रक्त हवे तेंव्हा का मिळत नाही?
रक्त हे फक्त सजीव प्राण्यांच्या शरीरातच निर्माण होते, आणि एका माणसाला रक्ताची गरज पडल्यास त्याच रक्त गटाच्या दुसर्‍या व्यक्तीकडूनच ते मिळवावे लागते. पूर्वी हिंदी सिनेमांमधे दाखवल्याप्रमाणे हे रक्त एका व्यक्तीकडून दुसर्‍याच्या शरीरात भरता येत नाही. रक्तपेढ्यांमधे एका व्यक्ती कडून रक्त घेऊन त्याच्यावर काही तपासण्या करून, ते रक्त शीत गृहामधे ठेवले जाते. जेंव्हा रुग्णाला रक्ताची गरज पडते तेंव्हा त्या रुग्णाच्या शरीरातील रक्ताबरोबर जुळणारे रक्त देण्याचे हे काम रक्तपेढ्यांमधे चोवीस तास चालते. पुण्यासारख्या शहरामधे २२ रक्तपेढ्यांमधून महिन्याला साधारणपणे ५००० रक्ताच्या पिशव्या रुग्णांना पुरवल्या जातात. हे रक्त मिळवण्यासाठी रक्तपेढ्या रक्तदान शिबिरे भरवतात अथवा निरनिराळ्या प्रकारे रक्तदात्यांशी संपर्क करून स्वयंसेवी रक्तदात्यांकडून रक्त गोळा करतात. रुग्णाच्या नातेवाईकांना सुध्दा रक्त देण्यासाठी आवाहन केले जाते. एव्हडे सर्व प्रयत्न करूनही रक्ताचा तुटवडा कायमच आहे. काही वेळा फार मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे घेतली जातात. परंतू त्यामधे गोळा होणार्‍या रक्तापैकी काही रक्त वाया जाते कारण गोळा केलेले रक्त ३५ दिवसांमधे वापरावे लागते.
रक्ताच्या तुडवड्यासंबंधी गेल्या काही महिन्यांमधे सकाळ मधे प्रसिध्द झालेल्या बातम्यांचा गोषवारा घेऊ.
१५ मे : नगर मधे रक्ताचा तुटवडा
८ एप्रिल : रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठ घटला
३१ मार्च : रुग्णाचा जीव वाचवण्यास या पुढे
२५ मार्च : रक्तपेढीत रक्ताचा ठणठणाट
१६ मार्च : पुण्यात रक्तपेशींची टंचाई
या समस्येवर मात करण्यसाठी रक्तपेढ्या आणि रक्तदानामधे काम करणार्‍या रक्ताचे नाते सारख्या संस्था तसेच अनेक कार्यकर्ते मनापासून प्रयत्न करतात. या पैकी बहुतेकांकडे रक्तदात्यांची रक्तगटाप्रमाणे वर्गीकरण केलेली यादी असते. परंतू आयत्या वेळी ही यादी फारशी उपयोगी पडत नाही. याची कारणे खालीलप्रमाणे
१) या यादीत कोणी कधी रक्तदान केले याची नोंद नसते. एकदा रक्तदान केल्यानंतर तीन ते चार महिन्यांमधे पुन्हा रक्तदान करता येत नाहे. त्यामुळे यादीतील अनेकांना फोन केल्यास त्यांनी अलिकडेच रक्तदान केल्याचे समजते. फोन करणारा अर्थात पुढच्या रक्तदात्याकडे वळतो. दुसर्‍या कोणाला रक्ताची गरज पडल्यास तो परत यादीच्या सुरुवातीपासून फोन करायला सुरुवात करतो.
२) काही रक्तपेड्यांनी या यादीचे संगणकीकरण केले असूनही प्रश्न सुटत नाही कारण रक्तदाता प्रत्येक वेळी एकाच रक्तपेढीमधे रक्त देतो असे नाही. जेथे गरज असते तेथे तो जातो.
३) काही संस्थांनी ही यादी माहितीच्या मायजालावर ठेवली आहे. परंतू आपल्या देशात फक्त १० ते १५ टक्के लोक इंटरनेट वापरतात. शिवाय रक्तदाता उपलब्ध आहे की नाही याची नोंद या वेबसाईटकडे नसते. तसेच अनेक संस्थाच्या अनेक वेबसाईट असून त्यामधे मेळ नसतो.
४) अनेक लोकांनी शिबिरात रक्तदान केलेले असते परंतू त्यांचे नाव कोणत्याही यादीत नसते. ७०% लोकांनी एकदाही रक्तदान केलेले नसते. त्यांना या यादीत सामावून घेणे अत्यावश्यक आहे.
या सर्व समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी रक्तपेढ्यांच्या सघटनेचे अध्यक्ष डॉ दिलीप वाणी गेली अनेक वर्षे रक्तपेढ्याना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. संगणकीकरण आणि माहितीच्या मायाजालात याचे उत्तर आहे हे सर्वांना माहिती होते, परंतू कायम बदलणारे संगणक, महागड्या आज्ञाप्रणाली आणि मनुष्यबळाचा अभावामुळे हे शक्य होत नव्हते. गेली अनेक वर्षे त्यांच्या बरोबर या विषयी वारंवार चर्चा करत असल्या मुळे या जिव्हाळ्याच्या विषयावर माझे प्रयत्न चालूच होते.
श्री उदय थत्ते या १०-१५ वर्षे अमेरिकेत राहून परत आलेल्या मित्राबरोबर वैद्यकीय व्यवसायातील संगणकीकरणासंबंधी निरनिराळ्या समस्यांसंबंधी चर्चा करता डॉक्टर व रुग्ण यांच्यामधील संवाद सुधारण्यासाठी माहितीच्या मायाजालाबरोबरच भ्रमणध्वनीचा कसा वापर करता येईल या संबंधी विचारमंथन सुरु झाले आणि अनेक प्रश्नांचे उत्तर चुटकीसरशी मिळाले..!! प्रायोगिक तत्वावर माझ्या रुग्णांना स्वाईन फ्ल्यू ची लस घेण्याचे आवाहन मी SMS पाठवून केले आणि त्याला रुग्णांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. रुग्णांनी हा SMS आमच्या हिताचा असल्याचे सांगितल्यावर आम्ही या क्षेत्रात काम करण्यासाठी हायटेक मेडिकल इन्फॉर्मेशेनल सर्विसेस या कंपनीची स्थापना केली. त्याद्वारे प्रथम सर्व पालकांना आपापल्या मुलाला लसिकरणाची आठवण करणारा एस. एम .एस. मिळण्यासाठी आम्हाला SMS करून मुलाची जन्मतारीख कळवण्याची सोय निर्माण केली. सकाळमधे बातमी प्रसिध्द झाल्यानंतर तीन दिवसांत ६०० पालकांनी आम्हाला असा SMS या क्रमांकावर पाठवला. आम्हाला आलेला SMS ज्या फोन वरून येईल त्या फोनवर SMS पाठवून मुलाची जन्मतारीख, नाव, पत्ता विचारला व जन्मतारखेनुसार लसीकरणाच्या आठवणीचे SMS पाठवायला सुरुवात केली. सध्या दररोज १५-२० पालकांना आरोग्यमित्र तर्फे ही सेवा मोफत पुरवली जाते.
सुमारे ६० ते ७० टक्के लोक मोबाईल वापरतात, बहुतेक वेळा हा फोन जवळ असतो आणि SMS चा खर्च खूप कमी असतो. या पध्दतीने हवी ती माहिती SMS वापरून गोळा करता येत असल्यामुळे आम्ही आमचा मोर्चा रक्तदानाच्या प्रश्नांकडे वळवला. डॉ. दिलीप वाणी व दिनानाथ रुग्णालयाच्या रक्तपेढीचे डॉ. केतकर यांच्याशी सल्लामसलत करून रक्तपेढ्या व रक्तदात्यांना जोडण्यासाठी मोबाईल फोन व माहितीच्या मायाजालाचा वापर करणारी संगणकप्रणाली तयार करण्यात आली. सह्याद्री हॉस्पिटलच्या रक्तपेढीतील डॉ. पूर्णिमा राव यांनी प्रोत्साहन दिले आणि पुण्यातील सर्व रक्तपेढ्यांची एक बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत रुबी हॉलच्या रक्तपेढीतील डॉ. मुजुमदार, जनकल्याणचे रविंद्र कुलकर्णी, पी. एस. आय. चे विकास बनसोडे आदींनी दिलेल्या सूचनांप्रमाणे या संगणक प्रणालीत विविध सुविधा करण्यात आल्या आहेत.
१) रक्तदाता असा SMS या क्रमांकावर पाठवून नोंदणी करु शकेल. त्याच्याकडून रक्त गट, वय, स्त्री/पुरुष, पत्ता, किती वेळा रक्तदान केले, शेवटचे रक्तदान कधी केले, पसंतीची रक्तपेढी इत्यादी माहीती तीन चार SMS द्वारे विचारली जाते. ही माहिती माहितीच्या मायाजालामधे साठवली जाते. प्रश्नावलीच्या शेवटी नाव व जन्मतारीख विचारली जाते. ही माहिती दिल्यास संगणक आपल्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करून रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्याची आठवण करेल.
२) रक्ताचा तुटवडा असेल तेंव्हा रक्तपेढ्या असा SMS या क्रमांकावर पाठवतील. रक्तगटाप्रमाणे, ज्या रक्तदात्यांनी गेल्या ४ महिन्यांमधे रक्तदान केले नाही अश्या त्या रक्तपेढी जवळील अथवा ती रक्तपेढी पसंत करणार्‍या ५ रक्तदात्यांना रक्तदानासाठी उपलब्ध अहात काय असा SMS संगणकाकडून केला जाईल. उपलब्ध नसल्यास किती तारखेपर्यंत, आणि कारण विचारले जाईल. परगावी गेल्यामुळे, किरकोळ आजारामुळे, मासिक पाळी, गर्भारपण मुळे काही काळ रक्तदान करणे शक्य होत नाही. अश्या अनेक कारणांची दखल ही प्रणाली बनवताना घेतली आहे. उपलब्ध नाही असे कळवणार्‍या रक्तदात्यांना काही काळापुरते सूचीतून वगळ्ले जाईल. आवश्यक तेव्हधे रक्तदाते उपलव्ध होईपर्यंत दर पाच मिनिटांनी पुढील पाच रक्तदात्यांना SMS पाठवला जाईल.
३) रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याने असा SMS केल्यास त्याला पुढील चार महिने परत SMS जाणार नाही. रात्रीच्या वेळी महिला रक्तदात्यांना SMS जाणार नाही. कामाच्या वेळात SMS येऊनये यासाठी रक्तदाते सूचना देऊ शकतील. अश्याप्रकारे केलेल्या SMS ला जास्तीतजास्त प्रतिसाद कसा मिळेल याकडे लक्ष देण्यात आले आहे.
४) रक्तदान केलेल्या व्यक्तींची नोंदणी पूर्ण होण्यासाठी रक्तपेढ्यांनी विशेष प्रयत्न करणे अपेक्षित आहे. त्या साठी पोस्टर्स देण्यात येतील. तसेच काही कारणाने एखाद्या रक्तदात्याकडून रक्त घेता येत नसेल तर त्याचे नाव यादीतून तात्पुरते वगळण्यासाठी संगणकाला सूचना द्यावी. उदा. रक्तक्षय, सर्दी तापा सारखी लक्षणे इत्यादी.
५) रक्तदात्यांना अत्यावश्यक तेंव्हाच SMS करणे हे या सेवेचे प्रमुख ध्येय आहे. रक्तदाते आणि रुग्णांना ही सेवा पूर्णपणे मोफत देण्यात येईल. रक्तपेढ्यांकडून नाममात्र शुल्क घेऊन ही सेवा पुरवण्यात येणार आहे. ही सेवा तोट्यात जाऊ नये आणि रक्तपेढ्यांनी या सेवेचा गैरफायदा घेऊ नये यासाठी महिन्याला १०० पेक्षा जास्ती वेळा रक्ताची गरज नोंदवणार्‍या रक्तपेढ्यांकडून जास्त शुल्क आकारण्यात येईल.
रक्तदानाच्या क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी आपल्या सूचना असा SMS करून पाठवाव्यात आणि सर्व रक्तदात्यांनी या योजनेला भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन रक्तपेढ्यांची संघटना आणि हायटेक मेडिकल इन्फॉर्मेशनल सर्व्हिसेस प्रा. लि. तर्फे करण्यात येत आहे. ज्यांनी एकदाही रक्तदान केलेले नाही त्यांनी आपले नाव आवर्जून नोंदवाने ही नम्र विनंती.
डॉ. राजीव जोशी